शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय
चार विमानांच्या माध्यमातून ५२० पर्यटक मुंबईत सुखरूप परतले
– पर्यटकांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार
श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार आतापर्यंत ४ विमनामधून ५२० पर्यटक मुंबईत परतले आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री १ वाजता स्टार एअरलाईन्स या खाजगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावले. यातून ७५ पर्यटकाना मुंबईत आणण्यात आले. तर आज दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता श्रीनगरवरून निघालेल्या आकासा एअरच्या दोन विमानातून ३७० पर्यटक मुंबईत परतले. हे विमान आज संध्याकाळी ७ वाजता तर दुसरे विमान अंदाजे ९ वाजता मुंबईत लँड झाले आहे.
त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. याशिवाय गुरवारी ७५ प्रवासी रात्री उशीरा मुंबईत परतले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून ५२० प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.