ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुष्य खुप सूंदर आहे ते जगता आले पाहिजे – उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर


केज/प्रतिनिधी :जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीत नाही तर आपल्या मनात रुजवले पाहिजे. आरश्यात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसं स्वीकारायला शिका खरंच आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त ते जगता आले पाहिजे. आयुष्यामध्ये चढ-उतार हास्य-अश्रू यश-अपयश येतच असतात. हे सर्व माणसाच्या जीवनाचा भाग आहे. आणि हेच जीवनाला सुंदर आणि खरोखर जगण्यासारखे बनवतात. नातेसंबंध टिकवण्यासाठी, संवाद, आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक आहे. तसेच या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसा माणसांमधील संवाद हरवत चाललाय. तेंव्हा एकमेकांशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. आपले विचार, भावना आणि अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करणे, एकमेकांच्या मतांचा, भावनांचा आदर करणे, एकमेकावर विश्वास ठेवणे, विश्वासघात टाळणे, परस्परांना समजून घेणे वेळ प्रसंगी अडचणीच्या वेळी साथ देणे, त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करणे निर्माण होणारे वाद मिटवणे, कठीण परिस्थितीतही एकमेकांना साथ देणे एकमेकांचा आधार बनणे तसेच नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.

केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि. २३ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती अंजली अभय धानोरकर, उप जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर या उपस्थित होत्या तर अध्यक्ष म्हणून श्री. नंदकिशोरजी मुंदडा हे उपस्थित होते. याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे सचिव जी.बी.गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, डॉ. वसुदेव नेहरकर, नारायण अण्णा अंधारे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्राचार्य शंकर भैरट, प्रा.वि.चे मु.अ. वसंतराव शितोळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय सुरेखा डांगे मॅडम यांनी दिला. चौथे पुष्प गुंफताना ” रंग मनाचे रंग नात्याचे ” या विषयावर बोलताना अंजली धानोरकर पुढे म्हणाल्या की, एकत्र कुटुंब पद्धती हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. परंतु आता विभक्त कुटुंबपद्धती दिसून येते. तेंव्हा जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जात असताना एकमेकांवरील अतूट विश्वास किती महत्त्वाचा असतो हे २०१३ मध्ये उत्तराखंड मधील केदारनाथ येथे अचानक आलेल्या प्रलयंकारी महापुराच्या अनुषंगाने सांगितले. यामहाप्रलयाने हजारो लोकांच्या जीवनावर परिणाम झाले. त्यामुळे बाधितांचे जीवन उध्वस्त झाले. त्या प्रलया मध्ये विजयसिंह नामक तरुणाला स्वतःची पत्नी लीला हिला गमवावे लागले. हे सत्य त्याच्या कुटुंबाने स्वीकारले, परंतु त्याचा मात्र ठाम विश्वास होता की, कधी तरी ती मला भेटेल, या विश्वासाने तो तिथेच राहिला. या अतूट विश्वासाला १९ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. शेवटी त्या विश्वासाचे सार्थक झाले व त्या दोघांची भेट झाली. एवढा अतूट विश्वास एकमेकांवर असला पाहिजे. यावेळी अशा अनेक प्रसंगांना आपल्या वर्णनातून रेखाटण्याचा प्रयत्न अंजलीताई धानोरकर यांनी केला.

अध्यक्षीय समारोपात नंदकिशोरजी मुंदडा म्हणाले की, स्व. विश्वंभर कोकीळ हे संघर्ष करण्याची ताकद असणारे व्यक्तिमत्व होते. परखडपणे मत व्यक्त करणे हा त्यांचा स्वभाव होता तर सुसंवाद साधून प्रश्न सोडविणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. अशा व्याख्यान मालेतून वैचारिक पिढी निर्माण होते. व अशी पिढी कुटुंबापलीकडे समाजा प्रती अथवा देशासाठी निष्ठेने कार्य करते. सध्याच्या काळामध्ये नाती विस्कटली जात आहेत, परंतु आपल्या अंतर्मनात चांगले भाव असतील तर चुकीच्या गोष्टीचे समर्थ न करता समाजामध्ये चांगले विचार पेरण्याचा निश्चित प्रयत्न होऊ शकतो. शेवटी त्यांनी अंबाजोगाई मधील वसंत व्याख्यानमालेचे स्वरूप ही उपस्थित श्रोत्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सुञ संचलन अपर्णा देशपांडे मॅडम यांनी केले तर आभार गौरी जगताप मॅडम यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *